ज्योतीची डायरी पोलिसांच्या हाती !   

हेरगिरीचे धागेदोरे उलगडणार 

चंडीगढ : हरयानातील यूट्यूबर आणि पाकिस्तानी गुप्तहेर ज्योती मल्होत्राची एक डायरी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे तिच्या पाकिस्तान आणि चीन दौर्‍याचा तपशील आणि हेरगिरी संदर्भातील तपशील अधिक मिळू शकेल, असा अंदाज पोलिसांना आहे. 
 
ज्योतीसह १२ हेरांना नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे पंजाब आणि हरयाना आणि उत्तर प्रदेशात कारवाई केली होती. या सर्वांनी उत्तर भारतात हेरगिरीचे एक जाळे तयार केल्याचे तपासात उघड होत आहे. आता ज्योतीची एक डायरी पोलिसांच्या हाती आली आहे. तिला डायरी लिहिण्याचा छंद आहे. परदेश प्रवासात ती नेहमी तिचा वापर करत असे. इंग्रजी आणि हिंदीत तिने काही नोंदी करुन ठेवल्या आहेत. त्या माध्यमातून तिची हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
डायरीतील सुमारे दहा ते अकरा पानांची असून त्यातील आठ पानांत पाकिस्तान दौर्‍याचा तपशील  इंग्रजीत तर तीन पानात हिंदीमध्ये लिहिला आहे. हिंदीतील मजकूर पाकिस्तानातून परत आल्यावर लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, मी पाकिस्तानच्या दहा दिवसांच्या दौर्‍यावर गेले होते. आता मी मायदेशी परतले आहे. मला माहित नाही की सीमा किती लांबपर्यंत आहे. आपण सर्व जण एकाच मातीचे आणि भूभागाचे भाग आहोत. सूत्रांच्या मते डायरीत ज्योती ही पाकिस्तानातील आदरतिथ्यामुळे भारावून गेली होती. भारतीय हिंदू धर्मीय नागरिक तेथील ऐतिहासिक  धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकतील., अशी तिची इच्छा दिसते पाकिस्तानातील मंंदिरे आणि गुरुद्वार अशा स्थळांना नागरिकांनी भेट द्यावी, असे तिला वाटते. 
 
ज्योतीला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.  हरयाना पोलिस आणि एनआयएकडून चौकशी सुरू आहे. प्रवासादरम्यान तिने केलेल्या खर्चाचा तपशील गोळा केला जात आहे. डायरीच्या माध्यमातून तिचा हेतु आणि संपर्क कोणाशी आहेत ? हे अधिक उजेडात येईल, असे पोलिसांना वाटते. ज्योतीने पहलतगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी काश्मीरचा आणि तत्पूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता.  या दौर्‍यातून तिची हेरगिरी आणि दहशतवादी हल्ला यांचे नाते आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 
 
तपासात उघड झाले की, पंजाबच्या मारेलकोटलाची रहिवासी गजाला (वय ३१) हिने पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील इशानची भेट व्हिसासाठी घेतली होती. गजाला आणि यामीन महमद दोघेही मारेलकोटचे रहिवासी आहेत. त्याला ११ मे रोजी अटक केली होती. दोघांनीही संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पोहोचविली असल्याचा संशय आहे. दरम्यान, गुरुदासपूरचा सुखप्रित सिंग हा देखील हेरगिरी करत होेता. त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. सैन्य दलाची संवेदनशील माहिती त्याने पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. 

काश्मीरचा दौरा केला होता?

ज्योतीने काश्मीरचा दौरा केला होता का ? याचा मागोवा डायरीच्या माध्यमातून पोलिस आता घेत आहेत. तिच्या सोबत पुरी येथील प्रियांका सेनगुप्ता नेहमी असे. तपास यंत्रणांनी देखील ज्योतीच्या प्रत्येक कार्यात ती सहभागी असल्याचे उघड केले आहे. तपास यंत्रणाच्या मते ज्योती रात्री उशिरापर्यंत काम करत असे. त्यामध्ये दृकश्राव्य चित्रफितीचे संपादन रात्री एक वाजेपर्यंत ती करत असे. घरच्या मंडळींना कामानिमित्त मी दिल्लीला जात असल्याचे सांगत असे. मात्र, ती दुसर्‍या ठिकाणी जात होती. समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये एकदा तिने बालीचा दौरा केल्याचे दिसते. आलिशान जीवनशैलीचे ते उत्तम उदाहरण ठरले आहे. ती हेरगिरी करत असल्याचे उघड होताच वडिलांसह कुटुंबीयांनी तिच्याशी नाते तोडले आहे. तसेच कौटुबिक छायाचित्रातून तिचे छायाचित्र काढून टाकून संताप व्यक्त केला. 
 

Related Articles